कल्याण – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यदिनी मटण, कोंबडी व मोठ्या जनावरांच्या कत्तलखाने २४ तास बंद ठेवण्याच्या आदेशावर माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय मनमानी असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट आव्हान दिले.
आव्हाड म्हणाले,
“श्रावण महिना आहे म्हणून मांसाहार बंद करण्याचा आदेश जारी करणं ही जनतेच्या हक्कांवर गदा आहे. शासनाने असा कोणताही आदेश दिलेला नाही. मग केडीएमसीला हा निर्णय घेण्याचा अधिकार कुठून आला? हा तमाशा बंद केला पाहिजे. उपमहापौर, महापौर नाहीत, लोकप्रतिनिधी नाहीत, मग आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगावं — हा निर्णय शासनाचा आहे का, की स्वतःचा?”
उपमुख्यमंत्री शिंदेंना आव्हान
आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे थेट बोट दाखवत म्हटलं,
“आपण ठाण्याचे पालकमंत्री आहात. जर तुमची भूमिका नॉनव्हेज विरोधी असेल, तर ती स्पष्ट करा. मग सरळ जाहीर करा की कल्याण-डोंबिवलीत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि दिवाळीला मांसाहार विक्री होणार नाही. माझं आव्हान आहे — हिम्मत असेल तर हा निर्णय अधिकृत करा.”
जातीय भेदभाव आणि धार्मिक दबावाचा आरोप
आव्हाड यांनी याला धार्मिक दबाव आणि जातीय भेदभावाचा प्रकार ठरवत म्हटलं की, “हे संघटनांचे टेस्टिंग आहे. आज एका शहरात बंदी आणली, लोकांनी विरोध केला तर थांबतील, नाहीतर पुढच्या वर्षी सगळीकडे बंदी येईल. हा सरळसरळ सनातनी मनुवाद आहे, जो बहुजन समाजाच्या हक्कांवर गदा आणतो.”
प्रशासनावर टीका, वैयक्तिक इशारा
आव्हाड यांनी ठणकावून सांगितले,
“मी 15 ऑगस्टला स्वतः एखाद्या घरात जाऊन मांसाहार करणार आहे. हिम्मत असेल तर मला तिथे येऊन अटक करून दाखवा.”
तसेच, त्यांनी आधी मिरा रोडप्रकरणी जशी उघडपणे भूमिका घेतली, तशीच आता घेण्याचा इशारा दिला.
केडीएमसीचा आदेश
केडीएमसीने गुरुवार रात्री 12 वाजल्यापासून शुक्रवार रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी मटण, कोंबडी व कत्तलखाने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
