गंजेवाडी (ता. तुळजापूर) – गंजेवाडी येथील शेतकरी दत्तात्रय पांडुरंग गंजे यांच्या शेतालगत बांधण्यात आलेल्या पाझर तलावामुळे गेली ३० वर्षे त्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, २०१४ पासून नुकसानभरपाईसाठी त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी इतक्या वर्षांत एकदाही शेताची पाहणी केली नव्हती.
शेतकऱ्याची ही व्यथा सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर जाधव यांनी जलसंधारण विभागाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा देत सुरुवातीला निवेदन सादर केले. पुढे ‘पादुका पूजन’ आंदोलनही करण्यात आले. काल, २२ मे रोजी, देशी गाईचे गोमूत्र व शेण घेऊन जलसंधारण अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी जाधव कार्यालयात गेले. मात्र, अधिकारी अनुपस्थित असल्याने त्यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू करत मुख्य गेट बंद करून निषेध नोंदवला.
या आंदोलनाचा धसका घेत जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी तत्काळ जाधव यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, “लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही,” असा ठाम पवित्रा जाधव यांनी घेतला. परिणामी, २७ मे रोजी स्थळ पाहणी करण्याचे लेखी आश्वासन विभागाने दिले.
मात्र, आंदोलकांच्या दबावाखाली अखेर आज, २३ मे रोजीच अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पाहणी केली. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला यश आल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
- लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती
- धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलन तीव्र: सकल मराठा समाजाची लवकरच जिल्हा बंदची हाक, मुंबईला जाणारा दूध-भाजीपाला बंद करण्याचा इशारा
- येडशी बसस्थानक वगळून जाणाऱ्या एसटी बसला चाप: ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीनंतर चालक-वाहकावर कारवाई