परंडा, ६ जुलै : परंडा तालुक्यातील सिरसाव ग्रामपंचायतीमध्ये १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून मंजूर पाणी फिल्टर प्रकल्पातील काम न करता तब्बल ७ लाख ५७ हजार रुपयांचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्यासह सहाजणांवर कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांच्या या धडक निर्णयामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
ग्रामस्थ गजानन पाटील, श्रीराम बोबडे आणि उमेश जाधव यांनी हा प्रकार उजेडात आणत पंचायत समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर विस्तार अधिकारी मार्फत चौकशी करण्यात आली. चौकशीत जिल्हा परिषद शाळेसाठी ३.२५ लाख आणि महालक्ष्मी मंदिर परिसरासाठी ४.३२ लाख रुपये निधी २०२२ मध्ये उचलण्यात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र आजअखेर पाणी फिल्टर पूर्णतः बसवले गेले नसल्याचेही उघड झाले.
पाणी फिल्टरचे काम अपूर्ण असतानाही संबंधित अभियंत्याने चुकीचे मोजमाप करून बिल पास केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय, ग्रामपंचायतीने ठेकेदाराला ताबा पत्र देवून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
ग्रामसेवक, सरपंच, अभियंता, ठेकेदार आणि तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी संगनमत करून ही रक्कम उचलल्याचा ठपका ठेवण्यात आला असून खालील सहाजणांना अपहाराची रक्कम ७ दिवसात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत :
- संतोष नागटिळक (तत्कालीन गटविकास अधिकारी) – ₹1,44,071
- पी.एम. जाधव (तत्कालीन ग्रामसेवक) – ₹1,44,071
- यशवंत हजगुडे (अभियंता) – ₹1,08,398
- संतोष लोकरे (ठेकेदार, सन फार्मा कंपनी) – ₹1,44,071
- कुमार पांडुरंग वायकुळे (सरपंच) – ₹1,08,398
- उल्हास देवकते (तत्कालीन ग्रामसेवक) – ₹1,08,398
गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी ४ जुलै रोजी ही नोटीस काढत संबंधितांना ७ दिवसांत रक्कम भरण्याचे निर्देश दिले असून न भरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
या कारवाईमुळे परंडा तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सिरसाव ग्रामस्थांच्या जागरूकतेमुळे हा अपहार उघडकीस आला असून, इतर ग्रामपंचायतींमधील निधी दुरुपयोग प्रकरणांचीही चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
- मद्यप्राशन केल्याचा संशय जिल्हा परिषदेतील ९ कर्मचाऱ्यांची अचानक चाचणी
- हायवेवरुन जाणाऱ्या वाहनावर चढुन चोऱ्या करणाऱ्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद
- लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण – खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर
- धाराशिव-सोलापूर रेल्वे प्रकल्पाचा खर्च 900 कोटींवरून 3000 कोटींवर दिशा समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची माहिती
- मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय : दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात वाढ, पायाभूत प्रकल्पांना गती