“मिशन कवच कुंडल” अभियान यशस्वी करण्याचे जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे आवाहन

0
105

                       

              उस्मानाबाद,दि.09(प्रतिनिधी):- जिल्ह्यात दि. 16 जानेवारी 2021 पासून कोविडच्या लसीकरणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 18 वर्षावरील एकूण 13 लाख 9 हजार लाभार्थींचे लसीकरण करणे अपेक्षित आहे. आता यासाठी  जिल्ह्यात मिशन कवच कुंडल  अभियान राबवण्यात येत आहे, हे अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी कोविड लस घेऊन स्वतःला कोविड पासून सुरक्षित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे केले. 

  आतापर्यंत 6 लाख 82 हजार (52 टक्के) लाभार्थ्यांना पहिला डोस आणि 2 लाख 73 हजार (20.85 टक्के) लाभार्थ्यांना दुसरा डोस देऊन संरक्षित करण्यात आले आहे.

कोविड-19 ची लस घेतल्यामुळे लाभार्थ्यांना तिहेरी फायदा होत असतो. ज्यामध्ये कोविड आजार होण्याचा धोका अत्यंत कमी होतो. तसेच आजार यदाकदाचित झाला तरीही त्याची तीव्रता अत्यंत कमी असते, ज्यामुळे आय.सी.यु.मध्ये दाखल होणे किंवा गंभीर आजार या बाबी टाळल्या जातात आणि कोविडमुळे होणारे मृत्यू टाळता येतात. यामुळे सर्व 18 वर्षावरील लाभार्थ्यांनी ही लस घेऊन स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबियांना संरक्षित करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित याबाबतच्या जिल्हा टास्क फोर्स च्या बैठकीतस्पष्ट केले.

  या अनुषंगाने शिल्लक राहिलेल्या सर्व लाभार्थ्यांचा पहिला डोस आणि देय असलेल्या लाभार्थ्यांचा दुसरा डोस लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. यामुळे कोविड-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत होणार आहे. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घोषित केल्याप्रमाणे “मिशन कवच कुंडल” ही विशेष मोहिम दि.08 ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यात  राबविली जात आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये या करिता जिल्हाधिकारी श्री. दिवेगावकर आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आज बैठक घेण्यात येऊन त्यामध्ये या मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये आरोग्य विभागा सोबतच नगरपालिका प्रशासन, पंचायत विभाग, शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पोलिस प्रशासन, महसूल विभाग यांच्या सहभागाने आणि सहकार्याने ग्रामीण भागामध्ये गावोगावी आणि नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रभांगामधून, माईकिंगद्वारे, दवंडीद्वारे, नगरपालिका क्षेत्रांमध्ये घंटागाडीच्या माध्यमांतून आदी विविध प्रकारे प्रसिध्दी करण्यात येत आहे. लसीकरण शिल्लक असलेल्या 18 वर्षावरील सर्व नागरिकांना मिशन कवच कुंडल अभियान आयोजित सत्रांमध्ये कोविडची लस घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के.पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हळकुंडे, डॉ.मुल्ला, डॉ.होले, डॉ.परळीकर, डॉ.मेंढेकर, श्री.पवार आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here