धाराशिव | ३० जुलै २०२५
भुम शहरातील आण्णाभाऊ साठे नगर परिसरात ३१ जुलैपासून ३ ऑगस्ट २०२५ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ अन्वये हा आदेश जारी केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुम शहरात दरवर्षीप्रमाणे मातंग समाजातर्फे साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येते. मात्र यंदा मातंग समाजाचे तीन गट समाज मंदिरासमोरच कार्यक्रम घेण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने त्यांच्यात मतभेद व तणाव निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने सर्व गटांना समजावून वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचे आवाहन केले होते, परंतु ते निष्फळ ठरल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाढली.
या पार्श्वभूमीवर, पोलीस निरीक्षक, भुम यांच्या शिफारसीनुसार व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, ३१ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आण्णाभाऊ साठे नगरमधील मातंग समाज मंदिराच्या ३० मीटर परिघात चार किंवा अधिक लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आली आहे.
कोणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.
हा आदेश आज, ३० जुलै रोजी अधिकृतरित्या लागू करण्यात आला असून तो संबधित परिसरात लागू राहील.
- ईट नगरीत कडाडणार शड्डूचा आवाज! खोपेश्वर महादेवाच्या पावन भूमीत रंगणार कुस्तीचा महासंग्राम
- विभागीय आयुक्त खोटे? अनंत कुंभार यांचा ‘नोटीस चुकून’ आल्याचा अजब दावा
- घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करणाऱ्या हॉटेलवर तहसील प्रशासनाची कारवाई, गुन्हा दाखल
- भाजप नेते धनंजय सावंत यांच्या गाडीला अपघात
- आ.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळाचे वाटप
