जमिनीतील ओलावा संपल्यावर बियाणे येऊन काय उपयोग? शेतकऱ्यांचा सवाल..
पारा (राहुल शेळके ): कृषी विभागाकडून रब्बी हंगामात हरभरा पिकाचे क्षेत्र वाढण्यासाठी सन 2021- 22 मध्ये हरभरा पिकाच्या प्रमाणित बियाणे वाटपाचा कार्यक्रम 18 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने वाशी तालुक्यात हरभरा पिकाचे 574 क्विंटल ज्वारीचे 204 क्विंटल प्रमाणित बियाणे परमिट द्वारे शेतकऱ्यांना वितरित केले आहे. याचा शुभारंभ वाशी तालुक्यातील पारा येथे गुरुवारी उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कमी किमतीमध्ये बियाणे मिळण्याचे परमिट वाटप करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांना परमिटवर लिहून दिलेले बियाणे संबंधित दुकानदाराकडून मिळाले नाही.वाशी तालुक्यातील कृषी मांडवा मंडळातील तीनशे शेतकऱ्यांना हरभरा वाणाचे राजविजय, फुले विक्रम याचे परमिट कृषी विभागाकडून देण्यात आले आहे . यापैकी 86 परमिट हे पारा येथील शेतकऱ्यांना दिले गेले आहे.दुकानदाराकडे गेले असता दुकानदाराने हे वाण आमच्याकडे आले नसल्यामुळे पारा येथील तब्बल 86 शेतकऱ्यांना वाशी येथून बियाणे न घेताच रिकाम्या हाताने घराकडे परतावे लागले. त्यामुळे पारा येथे घेतलेल्या पालकमंत्री यांच्या कार्यक्रमाचा देखावा शासनाचा की प्रशासनाचा असा प्रश्न सामान्य शेतकरी विचारत आहे. सध्या कृषी खाते शेतकऱ्यांची फरफट करत आहे, संबंधित शेतकरी चार दिवस झाले या बियाणांची वाट बघत आहे.या गंभीर गोष्टीकडे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांनी लक्ष देऊन ताबडतोब शेतकऱ्यांना बियाणे वाटप करावे. आधीच अतिवृष्टीने शेतकरी पुरता मेला आहे त्यात या कृषी विभागाकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या क्रूर चेष्टेला पूर्णविराम द्यावा अशी मागणी वाशी तालुक्यातील शेतकरी करत आहेत.
याबाबत उस्मानाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तिर्थकर यांच्याशी सम्पर्क केला असता त्यांनी सांगितले की “आम्ही वरिष्ठ स्तरापर्यंत ही बाब कळवली आहे.महाबीजच्या राज्य स्तरावरील अधिकाऱ्यांनाही ही बातमी पोस्ट केली आहे.उद्यापर्यंत पुरवठा सुरळीत होईल असे महाबीजकडून सांगण्यात आले आहे असे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.”