पार्टी विथ डिफरन्स ते पार्टी विथ क्रिमिनल? जनतेच्या भावनांचा करेक्ट कार्यक्रम !

0
327

तुळजापुरातला सत्कार समारंभ भाजपची राजकीय अपरिहार्यता !!

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तुळजापूर चे नाव जगभर आहे मात्र गेल्या फेब्रुवारीपासून ते बदनाम झाले ते ड्रग्स प्रकरणामुळे. फेब्रुवारी महिन्यात ड्रग्स च्या संदर्भातला पहिला गुन्हा दाखल झाला आणि त्याच्या मागोमाग त्यातील राजकीय कनेक्शन बाहेर आले मात्र हे राजकीय कनेक्शन अर्धवटच राहिले कारण सत्ताधारी भाजपच्या संबंधित विशेषतः आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या व्यक्तींचा त्यात असलेला समावेश. जिल्ह्यातील पोलिस सक्षम आहेत मात्र त्यांच्यावर दबाव कसा आहे याचे प्रत्यक्ष दर्शन घडले ते 1862 कोटींचा निधी आणल्याबद्दल आयोजित केलेल्या सत्कार समारंभात. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला मात्र त्यांनी या कार्यक्रमात ज्याची पाठ थोपटली ती व्यक्ती एम डी ड्रग्स प्रकरणात आरोपी आहे. जामिनावर ही व्यक्ती बाहेर असली तरी ड्रग्स चे सेवन केल्याचे त्यांच्याच बंधूंनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे त्याला क्लीन चिट मिळाली किंवा न्यायालयाने निर्दोष सोडलेले नसताना राजकीय कार्यक्रमात त्याची पाठ थोपटणे आणि तेही पोलिसांच्या समोर हा पोलिस तपासात दबाव आणण्याचा प्रकार नाही का? याबाबत विचारलेल्या प्रश्नाला महसूलमंत्री उत्तर देऊ शकले नाहीत मात्र त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आ. राणाजगजितसिंह पाटील यांनीच दिले आणि पोलिसांचे ॲफेडेविट उद्या देतो असे सांगितले दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत घेतली तीही थेट जिल्हाधिकारी कार्यालयात त्यात एक कागद मिळाला  तो पोलिसांचा जबाब होता मात्र त्यात पोलिसांनी विनोद गंगणे आरोपी नाही असे त्यात कुठेही म्हणले नव्हते त्यामुळे ड्रग्स प्रकरणात पोलिसांवर असलेला दबाव स्पष्ट होतो. भारतीय जनता पार्टी स्वतःला पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेते मात्र ती आता पार्टी विथ क्रिमिनल झाली असून आरोपींना राजकीय मंचावर घेणं भाजपची राजकीय अपरिहार्यता झाली आहे. विधानसभेच्या अधिवेशनात या ड्रग्स प्रकरणाची चर्चा होण्या आधीच सरकारने बाजू मांडण्या आधीच पोलिसांचे उत्तर व्हायरल झाले होते त्यावरून पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा दबाव दिसून आला होता. पुन्हा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्रमात आरोपींचा केवळ वावर नव्हता तर त्याचे नियोजनच त्यांनी केले असल्याने कालपर्यंत विरोध करणाऱ्या तुळजाईरवासीयांनी देखील हा कार्यक्रम निमूटपणे पाहिला आणि सहन केला. न्यायप्रविष्ट प्रकरणातील आरोपी ते ही गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजकीय कार्यक्रमात निर्दोषता सिद्ध होण्याच्या आधीच सहभागी होत असतील तर न्यायाची, पारदर्शकेतची अपेक्षा कोणाकडून करायची?

ड्रग्स प्रकरण साधेसुधे नसून त्यात अनेक तरुण त्यांचे कुटुंब, सामाजिक स्वास्थ्य याचा संबंध आहे. तुळजापूरला आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ बनवण्याची ग्वाही देणारे नेते अमित शहा आणि त्याच पवित्र मातीत गुन्हेगारांना राजाश्रय मिळत असेल तर केवळ तुळजापूर नव्हे तर संबंध जिल्हा सामाजिक स्वास्थ्य बिघडवून बसेल.

तसेच तुळजापूर ड्रग्स प्रकरणावरून शिवसेना (ठाकरे गट) आमदार कैलास पाटील यांनी फेसबुकवर व्हिडिओ पोस्ट करत राज्य सरकार, मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.

पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये महायुती सरकारवर पोकळ आश्वासने देऊन सत्तेत आल्याचा आरोप करत, “शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना देशोधडीला लावण्याचा जणू आराखडाच तयार होता” असे म्हटले आहे. त्यांनी तुळजापूरातील ड्रग्स प्रकरणाचा उल्लेख करत, “आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत ड्रग्स कोणी आणले, गुन्हेगारी कोणी वाढवली, हे सांगण्याची गरज नाही. मात्र, हे सरकार अशा प्रवृत्तींना बळ देत आहे,” असा आरोप केला.

महसूल मंत्री बावनकुळे यांचा ड्रग्स प्रकरणातील प्रमुख आरोपीकडून सत्कार स्वीकारणे आणि त्याच्या पाठीवर थाप देणे हा प्रकार जनतेसमोर संशय निर्माण करणारा असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात ड्रग्स माफियांविरोधातील कार्यवाहीबाबत विचारलेल्या लक्षवेधीच्या उत्तराचे व्हॉट्सअॅप ग्रुपवर लीक झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

“सभागृहात कारवाईचे आश्वासन देणारे मंत्री प्रत्यक्षात ड्रग्सच्या पाळेमुळे रुजवणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहेत, हेच का पारदर्शी, गतिमान सुशासन?” असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. तसेच, “पाशवी बहुमताच्या जोरावर आम्ही ठरवू ते धोरण हे महाराष्ट्रात चालणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here