नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्याचा निर्णय औरंगाबाद खंडपीठात रद्दबातल

0
85

 

न्यायालयाच्या निर्णयाने सत्याचा विजय झाला — शरण पाटील

उमरगा :उमरगा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ प्रेमलता टोपगे यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अपात्र ठरवले होते. या आदेशाविरुद्ध नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरुवारी (दि. १४) नगरविकास मंत्र्याचा आदेश रद्दबातल ठरवला आहे. हा शहरवासीयांचा व सत्याचा विजय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले.  

गुरुवारी (दि.१४) जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, उमरगा नगरपालिकेत काॅग्रेसच्या नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी साडेचार वर्षांच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी आणून शहरात विकासकामे केली आहेत. हा विकास विरोधकांना खुपत असल्याने नगराध्यक्षा प्रेमलता टोपगे यांच्या विरुद्ध  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाच्या नगरसेविकांनी जिल्हाधिका-याकडे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी कोणताही भ्रष्टाचार केला नसल्याचे प्रथम दर्शनी दिसुन येत असल्याचा अहवाल मंत्रालयाला पाठवला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना कांही मित्र पक्षांच्या राजकीय दबावाखाली व त्यांचे राजकीय हितसंबंध डोळ्यासमोर ठेवून नगरविकास मंत्र्यांनी नगराध्यक्षांना अपात्र ठरवले होते. त्यानंतर नगराध्यक्षा सौ. प्रेमलता टोपगे यांनी या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. गुरुवारी (दि. १४) न्यायालयाने  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला निकाल रद्दबातल ठरवला आहे. हा शहरवासीयांचा व सत्याचा विजय आहे. टोपगे त्यांच्या वतीने ॲड. व्ही. डी. सपकाळ व ॲड. लक्ष्मीकांत पाटील यांनी काम पाहिल्याची माहिती जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांनी केले.  या पत्रकार परिषदेला जिल्हा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, उमरगा बँकेचे चेअरमन रामकृष्णपंत खरोसेकर, माजी नगराध्यक्ष प्रेमलताताई टोपगे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश आष्टे, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप भालेराव, प्राचार्य दिलीप गरूड, ॲड. व्ही. एस. आळंगे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाअध्यक्ष याकुब लदाफ, नगरसेवक विक्रम मस्के, महेश माशाळकर, एम.ओ.पाटील, विजय वाघमारे, परमेश्वर टोपगे, अनिल सगर यांच्यासह काॅग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

विशेष लेखापरीक्षणात सेना, भाजपा, राष्ट्रवादीचे ९ नगरसेवक दोषी आढळून आले आहेत. त्यांचे विरुद्ध जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्र्याकडे तक्रार दिली पण याची दखल त्यांनी घेतली नाही. त्यामुळे आम्ही उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात दोषी ९ नगरसेवकाविरुध्द गुन्हा दाखल करणेसाठी याचिका दाखल केली आहे.  याची सुनावणी २५ आक्टोबर रोजी होणार असुन त्यांच्यावर लवकरच गुन्हा दाखल होईल. 

 — सौ.  प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here