धाराशिव | २५ जून २०२५ :
दरोडा, जबरी चोरी, वाहन चोरी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अनेक वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात गुन्हेगार मोतीराम उर्फ कुक्या बादल शिंदे (रा. मोहा, ता. कळंब, जि. धाराशिव) याला अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. तब्बल १७ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला ‘कुक्या’ हा पोलिसांच्या रडारवर असूनही अनेक महिन्यांपासून फरार होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने २५ जून रोजी शहरातील वरुडा पुलाजवळ सापळा रचून ही कारवाई केली. गस्तीदरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यानंतर हे धाडस केले गेले. कुक्या काही कामानिमित्त धाराशिव शहरात येणार असल्याची माहिती खात्रीशीर ठरली आणि पथकाने क्षणाचाही विलंब न करता अचूक नियोजनाने आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
कुक्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे पाहता तो धाराशिव, लातूर, बीड, तसेच नवनिर्मित अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर तब्बल पाच दरोडे, एक जबरी चोरी, एक दरोड्याचा प्रयत्न आणि दहा मोटरसायकल व डिझेल चोरीचे गुन्हे नोंद आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये तपास अधिकाऱ्यांना गुंगारा देत असलेल्या कुक्याचा अखेर पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही उल्लेखनीय कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोहेका शौकत पठाण (ब.क्र. ५७६), जावेद काझी (२८९), प्रकाश औताडे (९२९), फरहान पठाण (१२७५), चापोका नितीन भोसले (४८४), रत्नदीप डोंगरे (५३९) यांनी मिळून ही धडक कारवाई केली.
सदर आरोपीला पुढील कारवाईसाठी धाराशिव ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिस दलाच्या गुप्त माहिती संकलन व अंमलबजावणी क्षमतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे.
- रस्ते कामाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमा,नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशींवर प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
