दारूच्या नशेत पोलीस ठाण्याच्या काचेवर दगडफेक

0
153

धाराशिव – धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दारूच्या नशेत एका इसमाने काचेवर दगडफेक करत सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना घडली आहे.

फिर्यादी पोलीस हवालदार संतोष रामराजे पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते ९ ऑगस्ट सकाळी ८ वाजेपर्यंत ते पोलीस ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्यावर होते. त्यांच्यासोबत मदतनीस म्हणून पोअं/९१९ डी.बी. झोरी व वायरलेस ड्युटीसाठी पोअं/६६८ चव्हाण हेही ड्युटीवर होते.

रात्री १०.५२ वाजता तक्रारदार सुलताना हबीब निचलकर यांची तक्रार नोंदवित असताना, एक इसम दारूच्या नशेत येऊन अंमलदार कक्षाच्या काचेवर दगड मारून काच फोडली. बाहेर येऊन पाहणी केली असता, त्याचे नाव प्रदीप श्रीमंत लोखंडे (वय ४२, रा. तुळजापुरनाका, धाराशिव) असे समजले. आरोपीच्या तोंडाला दारूचा तीव्र वास येत होता. चौकशीत त्याने आपल्या गल्लीत भांडण झाल्याचे व लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्याच्या डोक्याला व हातापायावर किरकोळ जखमा होत्या.

घटनेची माहिती बीट मार्शल पोलिसांना दिल्यानंतर पोअं/११०१ भोसले व पोअं/१७०० घुगे घटनास्थळी आले. लोखंडे याने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने त्याच्यावर महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ कलम ३(१) व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here