तुळजापूरात १०८ फुटी शिल्पाच्या फायबर मॉडेलसाठी १० लाखाचे मानधन

0
210

३१ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया

वंचित बहुजन आघाडीचा विरोध

तुळजापूर – श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान व जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव यांच्या वतीने श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद देत असतानाच्या प्रसंगावर आधारित 108 फुट उंचीच्या ब्रॉन्झ धातूच्या शिल्पासाठी फायबर मॉडेल तयार करण्यासाठी नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत शिल्पकारांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.

निविदा व मानधनाचे स्वरूप

  • प्रस्तावित फायबर मॉडेलची उंची 2.5 ते 3 फूट असावी.
  • मॉडेल धार्मिक व ऐतिहासिक मार्गदर्शनानुसार तयार करणे आवश्यक.
  • मॉडेल तयार करणाऱ्या शिल्पकाराकडे शिल्पकलेतील पदविका/पदवी व किमान १५ वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक.
  • सर्व फायबर मॉडेल मुंबई येथील कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य येथे सादर करावेत.
  • मॉडेल सादर करण्याची मुदत १ ऑगस्ट २०२५ ते ३१ ऑगस्ट २०२५.

निवड प्रक्रिया व बक्षीस

  • प्राप्त सर्व मॉडेलपैकी ५ मॉडेल निवडले जातील; निवडलेल्या प्रत्येक शिल्पकाराला ₹१.५ लाख मानधन.
  • अंतिम निवड झालेल्या फायबर मॉडेलच्या शिल्पकाराला ₹१० लाखांचे मानधन.
  • निवड समितीची बैठक कला संचालनालय, मुंबई येथे होईल.

वंचित बहुजन आघाडीचा विरोध

“जिजाऊ-शिवराय दाखवा, चुकीचा इतिहास नको” – अनुराधा लोखंडे

वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा लोखंडे यांनी या शिल्प संकल्पनेला तीव्र विरोध दर्शविला आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, इतिहासात माँसाहेब जिजाऊ यांनीच शिवरायांना तलवार देऊन लढाईचे शिक्षण दिले, तर तुळजाभवानी देवीने तलवार दिल्याचा ठोस पुरावा नाही.
“देवीने तलवार दिल्याचे शिल्प उभारल्यास खऱ्या इतिहासाला तडा जाईल. त्यामुळे 108 फुटी शिल्पात जिजाऊ व शिवराय यांचेच दर्शन घडावे,” अशी मागणी त्यांनी आंदोलनातून केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here