जिल्ह्यातील तलाव पुनरुज्जीवन प्रचार मोहिमेची राहुल गुप्ता यांच्या हस्ते सुरुवात

0
100


 उस्मानाबाद,(प्रतिनिधी): जिल्ह्यातील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निती आयोग,भारतीय जैन संघटना आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने प्रचार मोहिमेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते  वाहनास हिरवी झेंडी दाखवून ही सुरुवात करण्यात आली.  

        उस्मानाबाद जिल्ह्यामधील लघुसिंचन साठवण तलाव,पाझर तलाव यामधील गाळ  काढून या तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी निती आयोगाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.  जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी आपल्या हद्दीतील तलावांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घ्यावा .जास्तीत जास्त गाळ काढावा असे आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी  केले.

       जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये या मोहिमेच्या प्रचारासाठी दोन गाड्या प्रशासनाने उपलब्ध करून दिल्या आहेत. तलावांचे पुनरुज्जीवन करण्याच्या या कामात  समन्वयक म्हणून जिल्हा परिषद  सहभागी झाली आहे. गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शेती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही मोहीम जिल्ह्याभरात राबवली जात आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी आपल्या गावाची निवड होण्याकरिता ठरावाचा अर्ज भारतीय जैन संघटनाकडे जमा करावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी प्रचार वाहने रवाना झाल्यानंतर आयोजित केलेल्या बैठकीत  केले. या बैठकीला भारतीय जैन संघटनेचे पुणे (वाघोली) येथील मुख्य व्यवस्थापक अशोक पवार,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अभिजीत मैदाड,जिल्हा समन्वयक दत्तात्रय पवार,भुजंग पाटील यांची उपस्थिती होती.

         जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये श्रीफळ वाढवून या वाहनांना  हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नितीन दाताळ, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, भांडार विभाग प्रमुख मधुकर कांबळे यांच्यासह सर्व तालुक्यातील गटविकास अधिकारी यावेळी उपस्थित होते.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here