धाराशिव – जिल्हाधिकाऱ्यांनी एखादा आदेश अथवा सूचना काढल्यास त्याचे पालन सर्व शासकीय यंत्रणांनी करणे अपेक्षित असते. मात्र, धाराशिव जिल्ह्यात उलट चित्र दिसून आले आहे. स्वतःच्या आदेशाचे पालन खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयानेच न केल्याची घटना उघड झाली आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांना व नगरपंचायतींना अवैध बॅनरांवर लगाम घालण्यासाठी कठोर सूचना देण्यात आल्या होत्या. या सूचनांनुसार, शहरातील प्रत्येक बॅनरवर QR कोड असणे बंधनकारक करण्यात आले होते, ज्यामुळे बॅनर लावणाऱ्यांची ओळख व वैधता त्वरित तपासता येईल.
परंतु, गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच लावण्यात आलेल्या एका बॅनरवर QR कोड नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे हा बॅनर वैध आहे की अवैध, हा प्रश्न निर्माण झाला असून, नियमभंगाचे हे उदाहरण खुद्द जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
शहरात बॅनर आणि होर्डिंग लावण्यासाठी ठराविक वेळ, ठिकाण आणि आकारमानाचे निकष निश्चित आहेत. त्याबाबत कर आकारणीची स्पष्ट तरतूद असून, या माध्यमातून नगरपालिकेला लाखो रुपयांचा महसूल मिळतो. परंतु, प्रत्यक्षात हे निकष पाळणे टाळले जात असल्याने अवैध बॅनर लावण्याचे प्रकार वाढले आहेत. धाराशिव शहरात, विशेषतः राष्ट्रीय महामार्गालगत, बॅनर सर्रासपणे लावले जातात. यामुळे केवळ शहराचे सौंदर्य बिघडत नाही, तर वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वेळा बॅनरमुळे दृष्टी आड झाल्याने किरकोळ अपघातांच्याही घटना घडल्या आहेत.
नगरपालिकेने आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत गंभीर पावले उचलणे आवश्यक असतानाच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच नियमभंग करणारा बॅनर लावला जाणे, ही बाब दुर्दैवी आणि लाजिरवाणी मानली जात आहे. नागरिकांचा प्रश्न आहे की, या बॅनरच्या वैधतेबाबत नगरपालिका स्पष्ट भूमिका घेणार का? की नेहमीप्रमाणेच चुकीकडे दुर्लक्ष करून ‘मूकसंमती’ दिली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सर्वपक्षीय विरोधकांना टक्कर देत आमदार तानाजी सावंतांनी गड राखला
- विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या रस्त्यावर अपघात; दोन ट्रॅक्टर पलटी, दुकाने व नागरिक थोडक्यात बचावले
- पेट्रोल पंपाला दंड,धाराशिव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल
- विदेशी दारू तस्करीवर उत्पादन शुल्क विभागाची धडक; १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
- भाजपची हुजरेगिरी करणे महागात पडले, खोटी माहिती पसरवल्याने अखेर तीन सोशल मिडिया पेजवर गुन्हा दाखल, महाराष्ट्रात खळबळ!
