चिवरी येथील श्री महालक्ष्मी मंदिर दर्शनासाठी सज्ज

0
131

सलगरा,दि.६ (प्रतिक भोसले)

घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात येणार आहेत. कोरोना मुळे मंदिरे बंद होती, मात्र सर्व मंदिरे गुरुवारपासून सुरू होणार आहेत. तुळजापूर तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चिवरी येथील महालक्ष्मी मंदिरामध्ये शासनाने तसेच मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन करत भाविकांना दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. खबरदारी म्हणून देवस्थान कडून गर्दी टाळण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुद्धा करण्यात येणार आहे. नेमून दिलेल्या अटीनुसार दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे, प्रत्येक भाविकाला मास्क लावणे जरुरीचे असून सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

  महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो म्हणून त्याच पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर सुध्दा स्वच्छ करण्यात आला आहे, तालुक्यातील चिवरी हे प्रसिद्ध जागृत देवस्थान असून निसर्गरम्य परिसरात बालाघाट डोंगर रांगांच्या पायथ्याशी चिवरी महालक्ष्मी मंदिर वसलेले आहे. सध्या सर्वत्र दाट वनराई आणि त्यात हिरवळीने नटलेल्या मनमोहक दृश्‍यामुळे परिसर अधिकच खुलला आहे. मंदिर हे डोंगराळ भागात अगदी शांत आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले आहे, त्या मुळे भाविक भक्तांसह निसर्गप्रेमी आकर्षित होताना दिसत आहेत. गेले काही दिवस मनसोक्त बरसणाऱ्या पावसाने परिसर हिरवळीने नटल्याने शहरासह ग्रामीण भागातील भाविक भक्त आकर्षित होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here