आपत्तीग्रस्त सामान्य माणसाला स्वत:च्या पायावर उभे करण्यास शासन मदत करणार -अमित देशमुख

0
102



उस्मानाबाद,दि.02(प्रतिनिधी):- अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या  उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर व इतर कांही गावात जाऊन आज पहाणी केली, ग्रामस्थ शेतकरी यांच्याशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला, आपत्तीग्रस्त सामान्य माणूस लवकरात लवकर  स्वत:च्या पायावर उभा राहील या दृष्टीने महाविकास आघाडीचे शासन सर्वतोपरी मदत करेल, दिलासा दिला जाईल, असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीच्या नुकसानीची पाहणी केलेल्या नंतर त्यांनी उस्मानाबाद येथे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत  आढावा   बैठक घेतली, तेंव्हा ते बोलत होते. अपद्ग्रस्तांच्या भावनेशी महाविकास आघाडी सरकार एकरूप असून, आगामी एक महिन्याच्या आत विमा कंपन्या आणि शासनाकडून सर्वांना मदत देण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

 शासकीय यंत्रणानी  मंगळवारपर्यंत नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून प्राथमिक अहवाल  शासनाकडे  सादर करावा. विमा कंपन्यांनी,  गावपातळीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तक्रारी स्वीकाराव्यात. महसूल आणि कृषी विभागाचे अहवाल विमा कंपन्यांनी सँपल सर्वे म्हणून स्वीकारावेत. ज्यांच्या घरात पाणी घुसले होते,  किंवा घराची पडझड झाली आहे, त्या अपद्ग्रस्तांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा  पुरवठा करावा. त्यांच्या कायमस्वरूपी   पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करून त्यावर कार्यवाही करावी, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले.

नुकसानभरपाई देताना अल्पभूधारक, भुभूधारक असा भेदभाव होऊ नये. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरला नाही, त्यांना शासनाच्या आपत्ती निवारण मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने मदत देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी कार्यवाही करावी, असे सांगून श्री.देशमुख म्हणाले अतिवृष्टी आणि पुरामुळे खराब झालेल्या रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करावे. पूर परिस्थितीमुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे, तो तातडीने पूर्ववत करावा.  धरणातून पाणी सोडल्यानंतर संगमाच्या ठिकाणी पाणी पातळीत वाढ होऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी कायमस्वरूपी तांत्रिक उपाय योजना कराव्यात, आदी सूचनाही बैठकीदरम्यान संबंधित विभागांना त्यांनी दिल्या.                                                                                                                                                     या बैठकीस माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तीर्थकर, तहसील गणेश माळी आदी उपस्थित होते.

बैठकीतील महत्वाच्या सूचना:

अभूतपूर्व नुकसानीचे ३-४ दिवसात पंचनामे पूर्ण करून शासनाकडे अहवाल सादर करावा,  पंचनामे करताना कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.  विमा कंपन्यांनी,  गावपातळीवर ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने स्वीकारावेत. एकही शेतकरी किंवा अपद्ग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता. ज्यांच्या घरात पाणी घुसले होते, त्या कुटुंबांना तातडीने जीवनावश्यक वस्तूंचा तातडीने पुरवठा करावा. अतिवृष्टी आणि पुरामुळे खराब झालेल्या रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे. अतिवृष्टीमुळे, शहरातील रस्तेही खराब झाले आहेत, नगरपरिषदा आणि महापालिकेने हे रस्ते दुरुस्तीची मोहीम हाती घ्यावी. आपत्तीमुळे खंडित झालेला वीजपुरवठा युद्धपातळीवर मोहीम राबवून पूर्ववत करुन घ्या. जलव्यवस्थपणासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा जेणेकरून भविष्यातील नुकसान टाळता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here