परंडा (दि. २० ऑगस्ट) :
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी आरोग्य मंत्री तथा परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी महसूल प्रशासनाला तात्काळ सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
आमदार सावंत यांनी महसूल प्रशासन तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधत जिल्ह्यातील प्रत्येक महसुली मंडळातील शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवले जाईल, याची काटेकोरपणे दक्षता घ्यावी, असे स्पष्ट केले. “एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही,” असा ठाम इशारा देत त्यांनी महसूल प्रशासनाला कार्यतत्परतेने काम करण्याचे आदेश दिले.
युवासेना तालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि कंडारी ग्रामपंचायतीचे सरपंच राहुल डोके यांच्याशी संवाद साधताना आमदार सावंत यांनी कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या पाठीशी राहण्याचे निर्देश दिले. तसेच जवळा गावातील रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
त्यांच्या आदेशानुसार शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, शिवसेना जिल्हा संघटक गौतम लटके, युवासेना तालुका प्रमुख राहुल डोके, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणी यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गावोगावी भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहाणी केली आणि संबंधित माहिती आमदार सावंत यांच्यापर्यंत पोहोचवली.
या पार्श्वभूमीवर बोलताना सावंत म्हणाले, “निवडणुकीपुरते काम न करता आताही तेवढ्याच ताकदीने करा. मतदारसंघातील सर्व रस्ते जे खराब झाले आहेत, ते तातडीने दुरुस्त करा. सरकारकडून निधी मिळेल किंवा नाही, पण आपल्या हातात जे आहे ते काम पूर्ण करा. एकही गट किंवा गण कामाविना राहू नये, याची कार्यकर्त्यांनी खबरदारी घ्यावी.”
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय आम्ही घेऊ. मात्र, आत्ता तुम्ही फक्त पंचनाम्यांची प्रक्रिया वेळेत आणि काटेकोर करा. तलाठी आणि मंडळ अधिकारी प्रत्यक्ष पंचनामे करत आहेत का, याचा आढावा घ्या,” असे त्यांनी महसूल प्रशासनाला बजावले.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या फटक्यामुळे संकटात सापडलेले असतानाच, आमदार सावंत यांच्या तातडीच्या आदेशामुळे महसूल प्रशासन आणि शिवसेना कार्यकर्त्यांची हालचाल वाढली आहे. पंचनामे तातडीने पार पडल्यास शेतकऱ्यांना लवकर मदतीचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
- रस्ते कामाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमा,नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशींवर प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
