
गिरवली, दि. २९ (प्रतिनिधी) – भुम तालुक्यातील सोन्नेवाडी येथील अकरा वर्षीय मुलाचा मंगळवारी (दि. २८) दुपारी तलावात बुडून मृत्यू झाला. विशेष म्हणजे सोमवारी (दि. २७) रोजी त्याचा वाढदिवस साजरा झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या दुर्घटनेमुळे सोन्नेवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोन्नेवाडी येथील शंभू दत्तात्रय सोन्ने हा पाचवीत शिकत होता. मंगळवारी तो आपल्या आजोबा आणि लहान भावासोबत जनावरे चारण्यासाठी सोन्नेवाडी शिवारात गेला होता. गिरवली फाटा–सोन्नेवाडी रोडलगत एक तलाव आहे. जनावरे चरत असताना शंभूने आजोबांना सांगितले की, “मी जनावरांना पाणी पाजून येतो,” असे म्हणून तो आपल्या लहान भावाला घेऊन तलावाकडे गेला.
लहान भाऊ पाण्याच्या बाहेर थांबला, पण शंभू बराच वेळ परतला नाही. त्यामुळे भावाने आजोबांना ही माहिती दिली. आजोबा तलावावर गेले असता त्यांना शंभूचे कपडे दिसले, मात्र तो दिसत नव्हता. त्यांनी तत्काळ गावातील तरुणांच्या मदतीने शोधाशोध सुरू केली. अखेर शंभूचा मृतदेह तलावात आढळून आला.
वाशी पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ईट येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर सोन्नेवाडी येथे त्याचा अंत्यसंस्कार करण्यात आला.
या दुर्दैवी घटनेमुळे सोन्नेवाडी व परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
- संजय निंबाळकर व भाजपचे नेते रामेश्वर शेटे यांचा आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश; आ.कैलास पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाची पुन्हा मजबूत बांधणी
- पारगावच्या लॉजवर AHTUचा धडाका!वेश्याव्यवसायावर पोलिसांची थेट कारवाई; परराज्यातील ८ महिलांची सुटका, लॉज मालक-मॅनेजर यांना अटक
- तुळजापुरात सरकारने हिंदुत्व गुंडाळलं, चायनिज कंपनीचे सीसीटीव्ही असलेल्या प्रकल्पाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
- पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
- परंड्यात अवैध शस्त्र बाळगणारे दोन अल्पवयीन पोलिसांच्या जाळ्यात; मॅगजिनसह अग्निशस्त्र जप्त