मसला खुर्द येथे सभागृह पाडले; प्रशासनाची डोळेझाक!

0
90

मसला खुर्द (ता. तुळजापूर) येथे शासकीय निधीतून उभारलेले नव्या सभागृहाचे बांधकाम पूर्ण होऊन अवघे सहा महिने होत नाही तोच ते जमीनदोस्त करण्यात आल्याने ग्रामस्थांत संतापाची लाट उसळली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या निधीतून तब्बल १० लाख रुपयांचा खर्च करून बांधलेले हे सभागृह अद्याप ताबा प्रक्रियेत असतानाच पाडण्यात आले. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणी मसला खुर्द येथील नागरिक हर्षद गुलाब पाटील यांनी ६ ऑक्टोबर २०२५ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर तसेच जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना स्मरणपत्र देऊनही कारवाईची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांत प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

तक्रारीत म्हटले आहे की, “शासकीय नवीन बंदिस्त सभागृह कामाचा ताबा पूर्ण न होता पाडण्यात आले आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठ स्तरावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी करण्यात आली आहे.

हे सभागृह आमदार राणा पाटील यांच्या विकासनिधीतून उभारण्यात आले होते. केवळ सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झालेले हे बांधकाम अचानक पाडण्यात आल्याने गावात आश्चर्य आणि संतापाचे वातावरण आहे. या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी देवानंद रेड्डी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

तक्रार दाखल होऊन आठवडा उलटला असतानाही प्रशासनाने ग्रामपंचायतीवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना अभय मिळत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामस्थांचा प्रश्न आहे — शासकीय निधीचा असा उघड अपव्यय होत असताना संबंधित अधिकारी गप्प का बसले आहेत? प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे तात्काळ लक्ष देऊन दोषींवर शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here