Home ताज्या बातम्या चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

0
चिंचपूरच्या शेतात गोवा बनावटीच्या मद्याचा साठा; ७.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त!

१७७ बॉक्स देशी दारू आणि ७ बॉक्स रॉयल स्टॅग व्हिस्कीचा समावेश; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, आरोपी फरार

धाराशिव (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीच्या देशी व विदेशी मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला. परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथील तलावाशेजारील शेतात २३ ऑक्टोबर रोजी छापा टाकून तब्बल ७ लाख ९२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत.
राज्यात अवैध मद्याची आयात, वाहतूक, साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार आणि संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात ही कारवाई सुरू आहे.
या मोहिमेदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूम येथील पथकाला गोवा राज्यात निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या मद्यसाठ्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार निरीक्षक आणि दुय्यम निरीक्षकांच्या पथकाने चिंचपूर (बु.) येथील तलावाशेजारील शेतात छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये गोवा बनावटीच्या ‘ढोकी संत्रा’ देशी दारूच्या ९० मिलिलिटर क्षमतेच्या १७ हजार ७०० सीलबंद बाटल्यांचा समावेश आहे. या बाटल्या एकूण १७७ बॉक्समध्ये होत्या. तसेच ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्कीच्या १८० मिलिलिटर क्षमतेच्या ३३६ बाटल्या, म्हणजेच सात बॉक्स, जप्त करण्यात आले. या संपूर्ण मद्यसाठ्याची किंमत ७ लाख ९२ हजार रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले.
महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला मद्यसाठा शेतात आणून साठविण्यामागे नेमका कोणाचा हात आहे, तसेच या मद्याची पुढे कुठे विक्री केली जाणार होती, याचा तपास आता सुरू आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, १९४९ मधील कलम ६५ (अ), ६५ (ई), ८१, ८३ आणि ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, कारवाईनंतर आरोपी फरार असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान तपास यंत्रणेसमोर आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिवचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भूमचे निरीक्षक एच. बी. लांडे, दुय्यम निरीक्षक बी. ए. राख, वाय. ए. कस्तुरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. बी. कोरे तसेच जवान ए. एन. कोळी, ए. एच. गवारी आणि आर. आर. कदम यांच्या पथकाने या मोहिमेत सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक बी. ए. राख करीत आहेत.
दरम्यान, अवैध मद्याची निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री किंवा साठवणुकीबाबत नागरिकांना काही माहिती असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या १८०० ८३३ ३३३३ या टोल फ्री क्रमांकावर किंवा जवळच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here