धाराशिव नगरपरिषदेच्या कारभारावर तीव्र संताप; विभागीय चौकशीची मागणी, आंदोलनाचा इशारा
धाराशिव : धाराशिव शहरातील नागरी समस्या दिवसेंदिवस तीव्र होत असून, नगरपरिषदेचा कारभार पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने धाराशिव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे. RPI (डे) चे जिल्हा संपर्क प्रमुख राज धज यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन सादर करत, विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी करून फड यांच्यावर कडक कार्यवाही करण्याची मागणी केली.
राज धज, अनिल वाघमारे, भोसले कृष्णा, कौतुक माने, अजय माने यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हस्ताक्षरित केलेल्या निवेदनात धाराशिव शहरात गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासक प्रणाली लागू असल्याने नगरपालिकेचा कारभार मुख्याधिकारी वसुधा फड यांच्याकडे आहे. मात्र, त्यांच्या निष्क्रीय आणि बेफिकीर कारभारामुळे शहरातील रस्ते, नाल्या, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, उद्याने, स्वच्छतागृहे आदी नागरी सुविधा पूर्णतः ठप्प झाल्या आहेत. परिणामी, नागरिकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
रस्ते खड्डेमय, सांडपाणी रस्त्यावर
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरातील बहुतांश रस्ते खड्डेमय असून वारंवार निवेदन देऊनही त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. परिणामी वाहतूक कोंडी, अपघात, किरकोळ वाद-भांडणे सतत घडत आहेत. याशिवाय, शहरातील नाल्यांची दुरुस्तीही न केल्याने अनेक भागांमध्ये सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
अंधारात शहर, वाढलेले गुन्हे
शहरातील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असून, रस्ते अंधारात गेल्यामुळे चोरी, दरोडे यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यासोबतच कचरा व्यवस्थापनही पूर्णतः कोलमडले असून विविध भागांमध्ये कचराकुंड्या भरून वाहत आहेत. त्यामुळे मोकाट जनावरांचा त्रास वाढला असून नागरिक वारंवार जखमी होत आहेत.
उद्याने आणि स्वच्छतागृहे दयनीय अवस्थेत
शहरातील सार्वजनिक उद्याने झुडपांनी झाकली गेली असून खेळणी तुटलेली, कुंपण पडलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांसह नागरिकांच्या करमणुकीचा हक्क हिरावून घेतला गेला आहे. तसेच शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ असून देखभाल व्यवस्थाच ठप्प झाल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
भ्रष्टाचाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
धज यांच्या म्हणण्यानुसार, मुख्याधिकारी फड यांच्या कार्यकाळात विविध भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता दोषींना पाठीशी घालण्यात आले आहे. याशिवाय, शासन आदेशांचे पालनही त्यांनी केलेले नाही.
आंदोलनाचा इशारा
मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या निष्क्रीयतेमुळे संपूर्ण नगरपरिषदेचा कारभार धोक्यात आला आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ बडतर्फ करून विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी आरपीआय (डे) कडून करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देखील या निवेदनात देण्यात आला आहे.
- रस्ते कामाच्या चौकशीसाठी एस आय टी नेमा,नगरविकास प्रधान सचिव गोविंदराजांच्या विरोधाभासी शिफारशींवर प्रश्नचिन्ह महाविकास आघाडीची पत्रकार परिषद
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
