पाहणीला आले आणि उद्घाटन करून गेले 

0
305

जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते पडसाळी पंपगृह पूजन करून उद्घाटन

पडसाळी पंपगृहाच्या कामाची अधिकाऱ्याकडून घेतली सविस्तर माहिती

सोलापूर, दिनांक 11 : कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प योजना क्रमांक दोन अंतर्गत पडसाळी येथे उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाचे पूजन व उद्घाटन जलसंपदा विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी पंपगृहाच्या कामाची सखोल माहिती घेऊन पाहणी केली.

या प्रसंगी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) चे उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजीतसिंह  पाटील, श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. थोरात, कार्यकारी अभियंता अमोल नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी प्रथम सिंचन प्रकल्पाच्या कामांची सविस्तर पाहणी केली. कृष्णा मराठवाडा योजनेतील टप्पा क्रमांक दोन अंतर्गत पडसाळी येथे उभारण्यात येणाऱ्या पंपगृहाचे पूजन विधिवत पार पडले. यानंतर प्रकल्पाच्या कार्यपद्धती, प्रगती आणि भविष्यातील लाभधारक क्षेत्राचा आढावा घेण्यात आला. या प्रकल्पामुळे सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर व भरपूर पाणी मिळणार असून, शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

पाहणीला आले आणि उद्घाटन करून गेले

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मराठवाड्यासाठी महत्वाची आहे मात्र या योजनेचे भिजत घोंगडे कायम आहे. आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी निवडणुकीपूर्वी पाणी येईल असे सांगितले होते मात्र अद्याप धाराशिव जिल्ह्यात पाणी आले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका आता तोंडावर असल्याने पाण्याबद्दल विचारणा होणार यामुळेच जलसंपदा मंत्र्याच्या हस्ते सोलापूर जिल्ह्यातील पडसाळी येथील पंपगृहाचे उद्घाटन केल्याचे बोलले जात आहे. जलसंपदा मंत्र्याच्या दौऱ्यात केवळ पाहणी असताना उद्घाटन होणे अजब असल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here