धाराशिव – धाराशिव तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांच्यावर एनए लेआउट प्रकरणात गंभीर भ्रष्टाचार व अनियमिततेचे आरोप होत असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांची नेमणूक करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
धाराशिव तालुक्यातील मनोज दगडू जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तहसीलदार मृणाल जाधव यांनी पदाचा गैरवापर करून एनए लेआउट करताना नियमबाह्य पद्धतीने कामकाज केले, शासनाची फसवणूक करत कोट्यवधी रुपयांचे महसुली नुकसान केले. या प्रकरणावर विधिमंडळात विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित केला असता महसूलमंत्री यांनी चौकशीसाठी समिती नेमण्याची घोषणा केली.
या चौकशीसाठी नांदेड येथील अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असली, तरी संबंधित अधिकाऱ्यांची धाराशिवच्या तहसीलदारांशी आधीच्या कार्यकाळातील जवळीक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे चौकशी निष्पक्ष न होण्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, तपास दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.
याशिवाय, एका सामाजिक कार्यकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीत मृणाल जाधव यांच्या नावे 100 कोटींपेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा दावा केला असून, या प्रकरणातील कार्यवाहीही प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
धाराशिव तहसीलदारांवरील भ्रष्टाचार, मालमत्ता अनियमितता आणि एनए लेआउटमधील गैरव्यवहाराची चौकशी तुकाराम मुंढे किंवा प्रवीण गेडाम यांच्यासारख्या निडर व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याकडे देण्यात यावी, अशी धाराशिव तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
निवेदनाची प्रत महसूलमंत्री, माजी मंत्री बच्चू कडू, लोकायुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, विरोधी पक्षनेते, गुप्त वसुली संचालनालय (ईडी), विभागीय आयुक्त तसेच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनाही देण्यात आली आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
