धाराशिव, दि. ८ जून २०२५ : धाराशिव जिल्ह्यातील घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठे यश मिळवले आहे. कुख्यात आरोपी कृष्णा ऊर्फ पिंटू खडेल शिंदे (रा. मुरुड) याला अटक करून त्याच्याकडून साडेआठ तोळे (८४ ग्रॅम) सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत जिल्ह्यातील १५ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. पथकात सहायक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कराळे (अंगुलीमुद्रा शाखा), पोलीस हवालदार विनोद जानराव, पोलीस हवालदार प्रदीप वाघमारे, पोलीस हवालदार नितीन जाधव, पोलीस हवालदार मनोज जगताप (अंगुलीमुद्रा शाखा), पोलीस नाईक बबन जाधव, पोलीस नाईक योगेश कोळी, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, चालक पोलीस हवालदार प्रकाश बोईनवाड आणि चालक पोलीस हवालदार विनायक दहीहंडे यांचा समावेश होता.
पेट्रोलिंगदरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर वाठवडा शिवारातील एका हॉटेलजवळ आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले. चौकशीत आरोपीने त्याच्या दोन साथीदारांसह धाराशिव शहर, ढोकी, वाशी, परंडा, लोहारा, आनंदनगर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील एका वर्षात अनेक घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरलेले सोन्याचे दागिने आणि पैसे याची वाटणी करून त्याने स्वतःच्या वाट्याचे दागिने मुरुड येथील घरी ठेवल्याचे सांगितले, ज्याचा उपयोग प्लॉट खरेदी आणि घर बांधण्यासाठी करणार होता. पोलिसांनी त्याच्या घरातून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.
जप्त मुद्देमाल आणि आरोपीला पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांना आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
- धाराशिवकरांना 18 महिने वाट पहायला लावून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री करणार उद्घाटन
- जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांवर ‘महिलाराज’, मात्र राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत बोटावर मोजता येतील इतक्या महिला!
- कुस्तीच्या आखाड्यातला मल्ल आता राजकारणाच्या मैदानात शड्डू ठोकणार!
- धाराशिव नगरपरिषदेच्या मतदार यादीत गंभीर त्रुटी; मुख्याधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
- धाराशिव जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर
