एसटी चालक-वाहकांचे 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण

0
387

मागण्या मान्य न झाल्यास सणासुदीत सेवा विस्कळीत होण्याची शक्यता

धाराशिव –
राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) उत्पन्नाचा कणा मानल्या जाणाऱ्या चालक आणि वाहक यांच्या आगारस्तरील प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत, येत्या 15 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या उपोषणामुळे श्रावण महिना आणि आगामी सणासुदीच्या काळात एसटी सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आगारातील विविध मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी चालक-वाहकांनी आगार व्यवस्थापकांना निवेदन सादर केले असून, त्याची प्रत राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री, विभाग नियंत्रक धाराशिव, विभागीय वाहतूक अधिकारी, कामगार अधिकारी, पोलीस निरीक्षक (आनंदनगर), विभागीय सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना पाठवण्यात आली आहे.

प्रमुख मागण्या अशा

  1. नियमानुसार आपत्कालीन भत्ता देणे.
  2. सेवा जेष्ठतेनुसार राज्य परिवहन महामंडळात कर्तव्याचे वाटप.
  3. सेवा जेष्ठतेनुसार रोटेशन तालिका तयार करणे.
  4. मुंबई, बोरीवली, भिवंडी पायलट कर्तव्याचा संपूर्ण मोबदला नियमानुसार देणे. अन्यथा, इतर आगारांप्रमाणे ‘स्क्रू’ सुविधा उपलब्ध करणे.

या मागण्यांसह आणखी काही मागण्या उपोषणाच्या निवेदनात समाविष्ट आहेत. “मागण्यांवर तातडीने अंमलबजावणी न झाल्यास 15 ऑगस्टपासून आम्ही आमरण उपोषणास बसू”, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

निवेदनावर वाहक ए. डी. शिरसकर, चालक एल. बी. सय्यद, वाहक के. बी. गायकवाड, चालक व्हि. टी. मुंडे, चालक एन. व्ही. रपकाळ, चालक जी. के. कात्रे, वाहक सौ. एम. एस. राऊत यांच्यासह एकूण 53 चालक-वाहकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये पुढील काही दिवसांत आणखी कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटीचे चालक आणि वाहक हे प्रवासी वाहतुकीचे थेट चालक घटक असल्याने, त्यांच्या संपाचा परिणाम थेट गाड्यांच्या वेळापत्रकावर होतो. त्यामुळे उपोषणाची अंमलबजावणी झाल्यास, सणासुदीच्या काळात प्रवाशांना गैरसोयीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here