शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांचा पलटवार
उस्मानाबाद (प्रतिनिधी) –
उस्मानाबाद (धाराशिव) येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह जागा हस्तांतरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी होण्याआधीच प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जनतेची दिशाभूल करण्याचा उद्योग भारतीय जनता पार्टीचे आमदार करत आहेत. तुम्हाला प्रसिद्धीच हवी असेल तर इतरही उद्योग आहेत. केवळ श्रेय लाटण्यासाठी सातत्याने जनतेची दिशाभूल का करता? असा सवाल शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
भाजपा आमदारांचे म्हणणे आहे की, सहा दिवसांपूर्वी भाजपा आमदारांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी दिलेली आहे. सामंजस्य करारावर स्वाक्षरी तर होणारच आहे. परंतु त्याआधीच केवळ श्रेय लाटण्यासाठी प्रसिद्धीचा हा खटाटोप बरा नव्हे, याची जाणीव ठेवा.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केल्यानंतर 2019 मध्येच समितीने पाहणी करुन अहवाल दिलेला होता. त्यावेळेसच मंत्रिमंडळात ठराव घेऊन शासननिर्णय का काढला नाही. यापूर्वी उस्मानाबाद येथे मंजूर झालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तुमच्या आताच्या नेत्याने नेरुळला पळविले. आता पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबादला होत आहे, ते आपल्या संस्थेला मिळावे यासाठी तुम्ही भाजपामध्ये गेला. पण आता हे महाविद्यालय शासकीयच राहणार आहे, हेच तुमचे दुखणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उस्मानाबाद येथे होत आहे, परंतु नेरुळमधून धूर का निघत आहे? याचे उत्तर जनतेला द्यावे.
उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे याकरिता खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आणि शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील हे महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊन येथील सर्वसामान्य जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि उपचार मिळावेत ही आमची प्रामाणिक भावना आहे. त्यासाठीचे श्रेय तुम्हाला घ्यायचे असेल तर घ्या, पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत सतत प्रसिद्धी पत्रके काढून जनतेची दिशाभूल करणे भाजपा आमदारांनी थांबवावे, असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमाणी यांनी केले आहे.