back to top
Sunday, September 15, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्याउस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा; स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समितीचे राज्यपालांना...

उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करा; स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समितीचे राज्यपालांना निवेदन

उस्मानाबाद – 
उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना आज (दि.30) जिल्हाधिकार्‍यांनामार्फत मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. 

स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीच्या अनुषंगाने उस्मानाबाद येथे कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची आज बैठक होऊन त्यानंतर मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत राज्यपालांना पाठविण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद जिल्हा हा नीती आयोगाच्या सर्वेनुसार देशातील मागासलेल्या जिल्ह्यांच्या यादीत तिसर्‍या क्रमांकावर आहे. सतत दुष्काळात होरपळत असलेला हा जिल्हा निजाम राजवटीपासून मागासलेलाच आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मुलींचे शिक्षणाचेप्रमाण आजही अल्यल्प आहे. तसेच उस्मानाबाद ते औरंगाबाद हे अंतर 250 किलोमीटर आहे. उस्मानाबाद जिल्ह्याची प्रगती करावयाची असेल तर शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे आणि येथील शैक्षणिक मागासलेपण दूर करायचे असेल तर उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ होणे आवश्यक आहे. म्हणून राज्यपाल महोदयांनी उस्मानाबादकरांच्या भावनांचा विचार करुन जिल्ह्यात लवकरात लवकर स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करुन येथील विद्यार्थ्यांना जागतिक व देशातील विविध स्पर्धेत टिकण्याची संधी उपलब्ध करुन द्यावी. 

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र आहे. उपकेंद्राकडे 60 एकर मालकीची जागा आहे. यु.जी.सी.च्या निकषानुसार स्वतंत्र विद्यापीठासाठी लागणार्‍या आवश्यक बाबी सदर उपकेंद्रात असल्याने स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी कसलीही अडचण नाही. सध्याच्या उपकेंद्राची इमारत सुसज्ज असून मुलांचे वसतिगृह आहे. विविध दहा विभाग आहेत. तरी उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठास मान्यता द्यावी, त्याचबरोबर या विद्यापीठाला मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर कृती समितीचे अध्यक्ष धनंजय शिंगाडे, उपाध्यक्ष प्रा.संजय कांबळे, सचिव राजाभाऊ ओव्हाळ, सदस्य संजय वाघमारे, प्रा.महेंद्र चंदनशिवे, दिलीप वाघमारे, संजय बनसोडे, हरिष डावरे, बाबासाहेब बनसोडे, प्रा.रवि सुरवसे, प्रा.राजा जगताप, दिलीप भालेराव, प्रा.जे.जी. लोकरे, मारुती बनसोडे, राम बनसोडे, आनंद पांडागळे, तानाजी माटे, बंडूभाऊ बनसोडे, अरुण बनसोडे, तानाजी बनसोडे, उदय बनसोडे, पृथ्वीराज चिलवंत, विजय बनसोडे, कानिफनाथ देवकुळे, सतीश कसबे, भागवत शिंदे, रमेश माने, अ‍ॅड.प्रदीप हुंबे, भाई फुलचंद गायकवाड, प्रताप कदम, दादा सरवदे, उमेश गायकवाड, सुरवसे,  सोमनाथ गायकवाड, भालचंद्र कटारे, अरुण माने, बाबुराव शिंदे, प्रदीप बनसोडे आदींची स्वाक्षरी आहे. 

स्वतंत्र विद्यापीठ निर्माण व्हावे ही मागणी आम्ही अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे करीत आहोत. उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाले तर मागास म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट पूर्ण होऊ शकणार आहे.
– धनंजय शिंगाडे
अध्यक्ष, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समिती

उस्मानाबाद येथे आज आंबेडकरी चळवळीतील शिक्षणप्रेमी विधिज्ञ, साहित्यिक, सामाजिकसह विविध क्षेत्रातील व्यक्तींची बैठक झाली. या बैठकीत उस्मानाबाद येथे स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीसाठी कृती समितीची स्थापन करण्याचा निर्णय झाला. स्वतंत्र विद्यापीठ निर्माण होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार आहोत.
– राजाभाऊ ओव्हाळ
सचिव, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समिती


महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव यांनी स्वतंत्र विद्यापीठ निर्मितीच्या अनुषंगाने नुकतीच उस्मानाबाद येथील उपकेंद्रास भेट देऊन पाहणी केलेली आहे. येथील भौगोलिक विचार करता उस्मानाबाद येथे विद्यापीठ होणे गरजेचे असून हे विद्यापीठ आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
– प्रा.संजय कांबळे
उपाध्यक्ष, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण कृती समिती
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments