टक्केवारीचा नेमका सूत्रधार कोण ? सतीश सोमाणी यांचा आरोप
उस्मानाबाद दि.७ (प्रतिनिधी) – मजूर सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामे केली जातात. त्यासाठी जिल्हा मजूर फेडरेशनचे संस्थेची शिफारस लागते. ते शिफारस पत्र देण्यासाठी फेडरेशनचे चेअरमन २ टक्के कमिशन घेत घेतात. त्यापैकी १ टक्का कार्यालयीन फीससाठी घेतली जात आहे. तर उर्वरित १ टक्का कशासाठी खर्च केला जातो याचा हिशोब दिला जात नाही. त्यामुळे उर्वरित १ टक्का ही रक्कम नेमकी कोणाच्या इशाऱ्यावरून घेतली जात आहे. शिवाय ती कशासाठी खर्च केली जाते. याचा ताळमेळ लागत नसून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे. त्यामुळे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे उस्मानाबाद तालुका प्रमुख सतीश सोमाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.७ जून केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भाजपाचे आ. राणाजगजितसिंह पाटील याच्या वर्चस्वाखाली चालणाऱ्या जिल्हा मजूर फेडरेशनकडून कोणत्याही कामासाठी टक्केवारी घेतली जात आहे. याबाबत अनेक तक्रारी आमच्यापर्यंत पोहचलेल्या असून त्या पुराव्यानिशी सादर करणार आहोत. तसेच
शासनाकडून मंजूर करण्यात आलेल्या विकासकामांचे वाटप जिल्हा मजूर फेडरेशनच्या शिफारशीनंतर मजूर संस्थाना केले जाते. परंतू या संस्थेकडून फेडरेशनची फीस म्हणून एक टक्का रक्कम घेतली जाते. तर आणखी एक टक्का रक्कम मजूर संस्थेकडून घेतली जाते. ही रक्कम तुम्ही का घेता? म्हणून फेडरेशनकडे विचारणा केली असता त्यांच्या हस्तकाने सांगितले की, फेडरेशनच्या चेअरमन यांना भारतीय जनता पार्टीचे तुळजापूरचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे सक्त आदेश आहेत की, पेमेंट घेतल्याशिवाय कामांची शिफारस द्यायची नाही. त्यामुळे भाजपा हा जसा डिजिटल पक्ष बनला आहे तसा डिजिटल भ्रष्टाचारही त्यांनी सुरु केला असल्याचा आरोप सोमाणी यांनी केला आहे. विशेष म्हणजे भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी काल खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याबद्दल जे वाचाळ वक्तव्य केले. त्याबद्दल सांगायचे तर आ. राणागजितसिंह पाटील यांना वाड्यावरुन रस्त्यावर आणल्याचे दुःख आहे. याआधी ते मुंबईत बसून जिल्ह्याची सुत्रे हलविण्याचे काम करायचे. मात्र आता त्यांना वाड्यावरुन वाडी-वस्तीपर्यंत जावे लागत आहे. त्यांच्या वाड्यावर येणाऱ्या लोकांची संख्या कमी झाल्यामुळे त्यांचा पोटशूळ उठला आहे. उलट खा. राजेनिंबाळकर यांना जनता प्रत्येक कामासाठी नेहमीच मदतीसाठी फोन करते. ते जनतेच्या सेवेसाठी किती वेळ देतात ? हे जनतेला चांगले माहीत आहे. परंतू भाजप नेत्यांचा पोटशूळ उठल्यामुळे ते जनतेला वेगळ्या वळणावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जनतेने त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सत्य जाणून घ्यावे. तसेच भाजपाचे आ. पाटील यांच्या वर्चस्वाखालील मजूर फेडरेशनच्या टक्केवारीची चौकशी करुन कारवाई करावी. अन्यथा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सोमाणी यांनी दिला आहे. या निवेदनावर गुणवंत देशमुख (ढोकी), राजाभाऊ भांगे, धनंजय वीर, विनोद पवार, रवि कोरे आळणीकर, आण्णासाहेब पवार, राजेंद्र तुपे (पळसप), दिनेश हेड्डा, धनंजय इंगळे, ओंकार आगळे, आबा सारडे, श्रीहरी शिवलकर, नितीन भोसले, दत्ता बंडगर, ओंकार सारडे, सोमनाथ मडके, विष्णू नाईकनवरे, सौदागर जगताप, राजाभाऊ पाडुळे, अमोल मुळे, मुकेश पाटील, आकाश पाटील, किरण चव्हाण, शिवलाल कुर्हाडे, युवराज गायकवाड यांच्या सह्या आहेत.