पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील मोकळ्या जागेत उद्यानाची निर्मिती करा

0
65


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीची नगर परिषदेकडे मागणी




उस्मानाबाद – 


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील मोकळी जागा अहिल्यादेवी उद्यानासाठी नियोजित करुन तारेचे कुंपण करण्यात यावे, अशी मागणी सर्व समाज बांधवांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती समितीच्या वतीने नगर परिषदेकडे करण्यात केली आहे. याबाबत समितीच्या पदाधिकार्‍यांनी आज (दि.8) मुख्याधिकारी हरिकल्याण येलगट्टे यांची भेट घेऊन निवेदन दिले. 



निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या कठीण काळानंतर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचा जन्मोत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहात साजरा केला. उस्मानाबाद शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामजिक उपक्रम राबवून अहिल्या जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या वर्षी उस्मानाबाद शहराचे प्रवेशद्वार असलेल्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांच्या आमदार निधीतून सुशोभिकरण करुन त्याचे 31 मे रोजी लोकार्पणही झाले आहे. उस्मानाबाद शहराच्या प्रवेशद्वारावर एक देखणा चौक निर्माण झाला आहे. 



या चौकाच्या पुढील आणि मागील भागात नगर पालिकेची मोठी जागा उपलब्ध आहे. जागतिक पर्यावरण दिन आणि शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीमार्फत या रिकाम्या जागेत दोन दिवसांपूर्वी 51 झाडे लावण्यात आली आहेत.



राजमाता अहिल्यादेवींचे कार्य अवघ्या देशाला माहित आहे. देशातील साडेतीन हजार सार्वजनिक आणि तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहण्यासाठी धर्मशाळा, पिण्याच्या पाण्यासाठी विहिरी, तलाव, हिमालयात गरम पाण्याचे कुंड, दळणवळणासाठी रस्ते, पर्यावरण आणि सावलीसाठी वृक्षारोपण, कार्यक्रमासाठी सभागृह, भाविकांचे अपघात टाळण्यासाठी नदीच्या काठावर घाट बांधले. तसेच भुकेलेल्यांसाठी अन्नछत्रे सुरु केली. त्यांच्या कार्याचे स्मरण करुन उस्मानाबाद शहराच्या सौंदर्यात अजून भर टाकण्यासाठी अहिल्यादेवी चौकात उपलब्ध असलेली रिकामी जागा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या उद्यानासाठी नियोजित करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.



या निवेदनावर मा.नगराध्यक्ष दत्ता बंडगर, मा.जि.प.सदस्य भारत डोलारे, भाजपा ओबीसी सेलचे डाॅ.गोविंद कोकाटे, जेष्ठ पत्रकार राजाभाऊ वैद्य, गुणवंत काकडे, डाॅ.संतोष पाटील, प्रा.मनोज डोलारे, प्रा.सोमनाथ लांडगे, प्रा.बालाजी काकडे, डाॅ.संजय सोनटक्के, दिनेश बंडगर, इंद्रजित देवकते, संदीप वाघमोडे, अशोक गाडेकर, मध्यवर्ती जयंतीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे, संतोष वतने, मुकुंद घुले, नागेश वाघे, रवी देवकते, सचिन चौरे, प्रशांत ढेकणे, शाम तेरकर, बिभीषण लोकरे,  संजय घोडके राजपाल दुधभाते, विनय कापसे, राजाभाऊ पवार, अजित भोरे, विवेक कापसे, शंकर काकडे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

या आहेत मागण्या


पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील जागा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यानासाठी नियोजित करावी.

 या जागेला तात्काळ तटरक्षक भिंत किंवा तारेचे कुंपण करण्यात यावे.


जागेचे लवकरात लवकर सुशोभिकरण करावे.

जागा मोठी असल्याने उद्यानात नागरिकांना चालण्यासाठी ट्रॅक, ओपन जीम, ज्येष्ठ नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात यावी.

जागेचे नियोजन करुन होळकरांचा इतिहास तेथे मांडण्यात यावा.

 विविध प्रकारची झाडे लावून हा परिसर सुशोभित करण्यात यावा.

प्रत्येक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी दिनी अहिल्यादेवी चौकात नगरपरिषदेच्या वतीने रोषणाई करण्यात यावी.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here