पारा (राहुल शेळके ): उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या गाडीवर गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वाशी तालुक्यात घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचे सरपंच नितीन बिक्कड हे दिनांक 17 जून रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या mh25 a w 6868 या स्वतःच्या खाजगी चारचाकी गाडीतून फक्राबाद येथून पारा गावाकडे एकटेच निघाले होते. ते येताळ वस्ती नजिक येताच दोन व्यक्तींनी त्यांच्या गाडीला हात केला. ओळखीचे कोणी असेल म्हणून बिक्कड यांनी वाहनाचा वेग कमी केला. याचवेळी चेहरा झाकलेल्या एकाने जीपच्या समोरून बंदुकीने एक गोळी जीपच्या दिशेने चालवली. अंदाज येताच बिक्कड यांनी गोळी चुकवली. यात जीपची काच फुटली. मात्र प्रसंगावधान राखून त्यांनी लागलीच जीपचा वेग वाढवला. तेव्हा मागच्या बाजूने ही एक गोळी जीपवर झाडण्यात आली. अत्यंत गतीने बिक्कड यांनी जीप तसेच पुढे नेली व वाशी पोलिसांना फोनवर माहिती दिली. त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना पारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुरेश दवळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन माहिती घेतली.
यानंतर नितीन बिक्कड यांच्या तक्रारीवरून वाशी पोलिसात अज्ञात दोघांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर हे करत आहेत.
शनिवारी सकाळी घटनास्थळावर पोलिसांना बुलेटचे रिकामी पुंगळी सापडली. घटनास्थळावर फॉरेन्सिक कार,डॉग स्कॉड, आय बाईक ,आय कार,सायबर एक्स्पर्ट, बॉम्ब शोधक पथक यांना पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलिस अधिकारी डंबाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक खणाळ यांनी भेट देऊन तपास कार्यास योग्य सूचना दिल्या.