एका दिवसाच्या बाळाचे अपहरण! दहा तासात आरोपीला पोलिसांनी पकडले

0
77

 

एलसीबी, विटा, तासगाव पोलिसांची संयुक्त दमदार कामगिरी: शेणोली स्टेशन ता.कराड येथे’त्या’ महिलेसह बाळ ताब्यात : आई – वडिलांनी सोडला सुटकेचा निःश्वास

तासगाव ( प्रतिनिधी)

      तासगाव येथील मध्यवस्तीत असणाऱ्या डॉ. अंजली पाटील यांच्या हॉस्पिटलमधून रविवारी आज सकाळी एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. या हॉस्पिटलमध्ये दोनच दिवसांपूर्वी परिचारिका म्हणून रुजू झालेल्या एका महिलेने हे निंदनीय कृत्य केले होते. दरम्यान, संबंधित महिला व त्या बाळाला शेनोली स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आले आहे. बाळाची तब्येत सुखरूप असून आई-वडिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. एलसीबी, विटा व तासगावच्या पोलिसांनी संयुक्तिकरित्या ही कारवाई केली.

       याबाबत माहिती अशी :  तासगाव येथील सिद्धेश्वर मंदिर चौकात डॉ. अंजली पाटील यांचा दवाखाना आहे. या दवाखान्यात चिंचणी येथील एक महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. एकच दिवसापूर्वी या महिलेचे सिझर करण्यात आले होते. दरम्यान, याच दवाखान्यात दोनच दिवसांपूर्वी एक महिला परिचारिका म्हणून रुजू झाली होती. या महिलेने आपण जुळेवाडी (ता. तासगाव) येथील असून रहायला तासगावातच असल्याचे संबंधित डॉक्टरांना सांगितले होते. सदर महिलेचे नाव स्वाती थोरात आहे  अशी माहिती प्राप्त झाले


      माझी सर्व कागदपत्रे जुळेवाडी येथे असून एक-दोन दिवसात तुम्हाला सर्व कागदपत्रे देतो, असेही या महिलेने डॉक्टरांना सांगितले होते. डॉक्टरांनी महिलेच्या सांगण्यावर विश्वास ठेवून तिला परिचारिका म्हणून कामावर घेतले होते. दरम्यान, आज सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ही महिला चिंचणी येथील सिझर झालेल्या ‘त्या’ महिलेच्या वार्डमध्ये गेली. तेथील एक दिवसाच्या बाळाला ताब्यात घेऊन ही महिला हॉस्पिटलमधून खाली आली. या बाळाला आपल्या काखेतील मोठ्या पर्समध्ये टाकून क्षणार्धात तिने बाळासह पोबारा केला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. 

     हॉस्पिटलमधून एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण झाल्याची बातमी तासगाव शहरासह जिल्हाभरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर सीसीटीव्ही फुटेज ‘व्हायरल’ झाले. या घटनेने जिल्हाभरात खळबळ उडाली. मुलाच्या मातेचे अश्रू थांबत नव्हते. दरम्यान, तासगावचे डीबी पथक तातडीने दवाखान्यात दाखल झाले. त्याठिकाणी ‘त्या’ मुलाचे आई-वडील, डॉक्टर व दवाखान्यातील स्टाफची प्राथमिक चौकशी करण्यात आली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली. जिल्हाभरात वायरलेसद्वारे मेसेज देण्यात आला. सर्वांनी गोपनीय खबऱ्या कामाला लावले.

     दरम्यान, एलसीबीचे सागर टिंगरे यांना संबंधित महिला बाळासह शेनोली स्टेशनवर असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून मिळाली. त्यांनी याबाबत तातडीने विटा येथील वाहतूक पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच विट्याचे वाहतूक पोलीस प्रसाद सुतार,(रा तासगाव)अमोल जाधव व अन्य काहीजण तातडीने शेनोली स्टेशनकडे रवाना झाले. या पोलिसांनी संबंधित महिला व बाळाला ताब्यात घेतले. दरम्यान तासगावचे डीबी पथकही शेणोली स्टेशनवर पोहोचले.

     सायंकाळी बाळासह सबंधित महिलेला तासगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिचे गाव खानापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. तीने हे कृत्य का व कोणासाठी केले, याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, अवघ्या आठ-नऊ तासात या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here