नाशिक | प्रतिनिधी
राजकारणाच्या रंगमंचावर ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चेला चालना मिळाल्याने, वरिष्ठ नेते तथा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे. “ठाकरे बंधू एकत्र आले, तर मला सर्वाधिक आनंद होईल,” असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले.
एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जवळून काम केले आहे. जेव्हा राज ठाकरे वेगळे होण्याच्या निर्णयावर होते, तेव्हा मी स्वतः पुढाकार घेऊन राज आणि उद्धव या दोघांनाही फोन केला होता. त्यांना काही दिवस शांत राहण्याचा सल्ला दिला होता, कारण कधी कधी भावना शांत झाल्यावर निर्णय बदलू शकतो. दुर्दैवाने तसे झाले नाही.”
“आजही जर ते दोघे एकत्र आले, तर त्यांच्या शक्तीला गती मिळेल. दोघेही स्वतंत्र पक्षाचे प्रमुख असले, तरी त्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आहे. शिवसेनेची ताकद निश्चितच वाढेल,” असेही ते म्हणाले.
मराठी सक्तीबाबत विचारले असता, भुजबळ यांनी विचारपूर्वक भूमिका मांडली. “मराठी भाषा शिकवलीच पाहिजे, हे बिनविवाद आहे. पण भाषा सक्तीने शिकवण्याऐवजी प्रेरणेने शिकवली गेली पाहिजे. आजच्या काळात विज्ञान, गणित, माहिती तंत्रज्ञान यासारख्या विषयांमध्ये प्रावीण्य मिळवणे आवश्यक आहे. मुलांनी एकाच वेळी अनेक भाषा शिकणे हे त्यांच्या शैक्षणिक भारात भर घालू शकते. म्हणून, सक्तीऐवजी समतोल विचार आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने लावलेल्या फलकावरही भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. “भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे,” अशी मागणी त्या फलकावर होती. यावर ते म्हणाले, “कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, त्यामुळे त्यांनी अशी मागणी फलकाद्वारे व्यक्त केली असावी. त्यावर फारसा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.”