दहा मोटारसायकलसह आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

0
40

धाराशिव: स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद असलेल्या दहा चोरीच्या मोटारसायकलसह आरोपीला अटक केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक  गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुप्त माहितीवरून कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे व त्यांच्या पथकाने पेट्रोलिंगदरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई केली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आबा उर्फ अशोक अर्जुन पवार (रा. उमरा, ता. कळंब, जि. धाराशिव) याने धाराशिव व इतर जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर मोटारसायकली चोरल्या असून, तो सध्या कळंब येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. त्याच्या ताब्यात चोरीची एक मोटारसायकल असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तत्काळ कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक चौकशी केल्यानंतर त्याने चोरीच्या मोटारसायकलींबाबत माहिती उघड केली.

चोरीच्या दहा मोटारसायकली जप्त चौकशीत आरोपीने त्याच्या चुलत्यासोबत मिळून अनेक मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. त्याने काही मोटारसायकली उमरा येथील घरात, तर इतर तळ्याच्या बाजूला झाडाझुडपांमध्ये लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी छापा टाकून चोरीच्या 10 मोटारसायकली (एकूण किंमत ₹3,00,000) जप्त केल्या.

सदर मोटारसायकली धाराशिव, बीड, सोलापूर आणि पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. या मोटारसायकलींबाबत धाराशिव शहर, कळंब, तुळजापूर, शिवाजीनगर (बीड), गेवराई (बीड), मोहळ (सोलापूर), विमानतळ (पुणे), सिंहगड रोड (पुणे), स्वारगेट (पुणे) या ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे आढळून आले.

पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी या महत्त्वपूर्ण कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अथक परिश्रम घेतले. या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोह/327 जानराव, पोह/530 निबांळकर, पोह/1003 वाघमारे, पोना/1479 जाधवर, पोना/1611 जाधवर, चालक पोह/1248 अरब, पोअं/693 दहीहंडे, पोअं/662 गुरव यांनी सक्रिय सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here