धाराशिव -महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या कार्यकारी अभियंत्याला मारहाण प्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर पाटील यांच्यासह त्यांचा मुलगा अभिराम पाटील तसेच स्विय सहाय्यक स्वप्नील पाटील यांच्यावर उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की अतिरिक्त कार्यकारी अभियंता रविंद्र फकीरा पवार वय ५२ वर्षे यांनी सुधीर पाटील यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानंतर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उस्मानाबाद प्रभारी कार्यकारी अभियंता पवार हे एमएसईबी रेस्ट हाऊस सोलापुर रोडवरील पळसवाडी रोड लगत रेस्ट हाऊसचे पाठीमागील बाजुस मेजर स्टोअर मध्ये कार्यालयीन कामकाज करत असताना सुमारे ११.०० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या सोबत स्टोअर किपर राजु काळे हा पण सोबत काम करत होता. सदर वेळी उस्मानाबाद येथील सुधीर केशवराव पाटील, अभिराम सुधीर पाटील, स्वप्नील पाटील व इतर दहा ते बारा लोक हे अचानक कार्यालयात येवून शिवीगाळ करत आले. त्यांनी शिवी देण्यांचे कारण विचारता सदर लोकांनी त्यांना गच्चीस धरून खाली पाडून लाथाबुक्यांने मारहाण करुन जिवे मारण्यांची धमकी दिली अशी तक्रार अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम, ३५३, ३३२,५०४,५०६, १४३,१४७,१४९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.