साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाजातील 12 पोटजातीतील अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी आणि मादिगा या जातीतील व्यक्तींची आर्थिक उन्नती होण्यासाठी अनुदान योजना, बीजभांडवल योजना व थेटकर्ज योजना राबविण्यात येते.
1) अनुदान योजना : प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक असलेल्या कर्ज प्रकरणात महामंडळाकडून अनुदान देण्यात येते. प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के किंवा 10 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.
बँक कर्ज : अनुदान वगळून बाकीची सर्व रक्कम बँकेचे कर्ज असते. या कर्जावर बँकेच्या दराप्रमाणे व्याज आकारणी होते. कर्ज फेड 36 ते 60 मासिक समान हप्त्यात बँकेकडे करावी लागते.
2) बीजभांडवल योजना :
प्रकल्प मर्यादा : 50,001 ते 7,00,000 रुपयांपर्यंत.
बँक कर्ज : 50,001 ते 7,00,000 रुपयांपर्यंतच्या मंजूर कर्ज प्रकरणांमध्ये 10,000 रुपये अनुदान वगळता उर्वरित कर्ज राशीमध्ये 5 टक्के अर्जदाराचा सहभाग, 20 टक्के महामंडळाचे कर्ज (10,000 रुपये अनुदानासह), 75 टक्के बँकेचे कर्ज या राशीमध्ये विभागणी असेल.
3) थेटकर्ज योजना :
प्रकल्प मर्यादा : एक लाख रुपये.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत भागभांडवली अंशदानाच्या निधीतून 25,000 रुपयांपर्यंत प्रकल्प मर्यादा असलेली थेटकर्ज योजना राबविण्यात येत होती. या योजनेमध्ये शासन निर्णय क्र.एलएएस-2022/प्र.क्र.94/महामंडळे/दि.04 नोव्हेंबर 2022 अन्वये बदल करण्यात आलेला असून महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेटकर्ज योजनेच्या कर्जाची मर्यादा 25,000 वरुन 1 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.