डोंजा गावासह तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ
डोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवड रद्द
बेकायदेशीर नामनिर्देशन पत्र, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश
परंडा (भजनदास गुडे) तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाची समजली जाणार्या डोंजा ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष ढेंबरे,उपसरपंच स्वाती सुर्यवंशी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या विरोधात ९ ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या प्रकरणीची सुनावणी घेऊन सरपंच व उपसरपंच यांची निवड रद्द केल्याने संतोष ढेंबरे यांचे सरपंच पद , तर स्वाती सुर्यवंशी यांचे उप
सपंचपद रद्द केल्याने डोंजा गावा सह तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
डोंजा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडनुक स.न.२०२१ मध्ये संपन्न झाली.ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांनी विशेष सभेची नोटीस सर्व सदस्यांना कायदेशीर रित्या बजावली नाही. सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक दि.९ फेब्रुवारी २०२१ रोजी ठेवण्यात आली होती परंतु सभेचा कोरम पूर्ण न होऊ शकल्यामुळे सदर निवडणूक दि.१० फेब्रुवारी २०२१ रोजी घेतली.सदर सरपंच पदाच्या निवडनुकी साठी संतोष ढेंबरे यांचे तर उपसरपंच पदाच्या निवडणूकी साठी स्वाती सुर्यवंशी यांचे नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते.सदर नामनिर्देशन पत्र हे बेकायदेशीर आहे.नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून पांडुरंग सुर्यवंशी यांची स्वाक्षरी दिसून येते परंतु सदर स्वाक्षरी ही पांडुरंग सुर्यवंशी यांनी केलेली नव्हती. यांची बनावट स्वाक्षरी करून नामनिर्देशन पत्र ढेंबरे यांनी भरले होते.निवडणूक निर्णय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी यांनी सदर स्वाक्षरी ची शहानिशा न करता संतोष ढेंबरे यांचे नामनिर्देशन पत्र बेकायदेशीर रित्या स्विकारले.म्हणून सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग कुंडलिक सुर्यवंशी,मैना हनुमंत शिंदे,आप्पासाहेब खेमचंद पोळ, रणजित आबासाहेब सुर्यवंशी, अमोल श्रीकृष्ण पाटील,अश्विनी अरुण काळे,तारामती संतोष सिरसट, काशीबाई पोपट यशवंत, शिल्पा रामचंद्र घोगरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती.
डोंजा ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यानी दिलेल्या तक्ररारी अर्जावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सुनावणी घेतली.या सुनावणीत डोंजा ग्रामपंचायतीच्या ११ ग्रामपंचायत सदस्यां पैकी एकूण ९ सदस्यांनी एकत्रितरित्या तक्रारी अर्ज करत डोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक २०२१च्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ग्रामपंचायत डोंजा येथील सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक ही तणावमुक्त वातावरणात लोकशाही पध्दतीने झाली नाही असे निष्कर्ष नोंदवलं.यावर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले.डोंजा ग्रामपंचायत सरपंच पदांची निवडणूक २०२१ मध्ये संतोष ढेंबरे यांची सरपंच पदी तर स्वाती सुर्यवंशी यांची उपसरपंच पदी झालेली निवड वैध नसल्याने रद्द करण्यात आली,असा निर्णय दिला.
या जिल्हाधिकारी यांच्या निर्णयामुळे डोंजा गावासह तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.