जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या सलगऱ्यात रास्ता रोको
सलगरा,दि.८- (प्रतिक भोसले)
आरक्षणाच्या मागणीसाठी जालना, अंतरवाली सराटी येथे उपोषण करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महिलांच्या पुढाकाराने सलगरा (दि.) आणि पंचक्रोशीतील सकल मराठा समाजातर्फे उद्या शनिवार, (दि.९ सप्टेंबर) रोजी सकाळी ०८ वा.सु. श्री शंभू महादेव मदिरातून सुरूवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, सलगरा (दि.) येथे पोलीस बंदोबस्तात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, यासाठी शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी, लहान मुले, वृद्ध महिला यांना तेथील पोलीस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला. या घटनेच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलेल्या आवाहनाचे पालन करून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
अनेक वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यासाठी आजवर अनेक आंदोलने झाली. तरीसुद्धा कोणत्याच सरकारने यावर ठोस निर्णय घेतला नाही. तेव्हा आता तरी यासंदर्भात सरकारने तत्काळ ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.