सलगरा : प्रतिक भोसले
सलगरा (दि.), ता. तुळजापूर येथील प्रविण अशोक कुंभार हे दि. 06.03.2022 रोजी 02.30 वा. सु. औसा रस्त्यावरील समर्थ हॉटेलसमोर आपला मालवाहू ट्रक क्र. एम.एच. 01 डीआर 8000 हा उभा करुन ट्रकच्या केबीनमध्ये झोपले होते. दरम्यान तीन अनोळखी पुरुषांनी प्रविण कुंभार झोपलेल्या ट्रकच्या केबीनच्या चालक सिटच्या पाठीमागील कप्प्यात ठेवलेली 25,000 ₹ रक्कम चोरुन जवळच उभ्या असलेल्या ट्रक क्र. एम.एच. 18 एए 7377 व ट्रक क्र. एम.एच. 12 एफझेड 9137 मधून औसा रस्त्याने पसार झाले. यावर प्रविण कुंभार यांनी आपल्या ट्रकची पाहणी केली असता ट्रकच्या डिझेल टाकीचे कुलूपही तुटलेले त्यांना आढळले. यावर प्रविण यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून गुन्हा क्र. 70 / 2022 हा 379, 34 अंतर्गत नोंदवला आहे.
सदर गुन्हा तपासादरम्यान तुळजापूर पोलीसांनी गतीमान तपास करुन मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नमूद दोन्ही ट्रक खंडाळा – कार्ला रस्त्यालगत उभे असल्याचे पथकास आढळले. पथकाने त्या ट्रकजवळ जाउन ट्रकमध्ये असलेल्या दोन पुरुषांची विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे 1) उमेश नाना पवार, रा. लोनखस, ता. वाशी 2) ज्ञानेश्वर भागवत शिंदे, रा. रामकुंड, ता. वाशी अशी सांगीतली. पथकाने त्यांच्या ट्रकची तपासणी केली असता वाहनातील इंधन चोरी संबंधीचे साहित्यही त्यांच्या जवळ मिळुन आले. यावर पथकाने त्या दोघांची झडती घेउन त्यांच्या ताब्यातून चोरीच्या नमूद रकमेपैकी 15,000 ₹ जप्त करुन त्या दोघांना अटक केली असून त्यांच्या उर्वरीत साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.